'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून रसिकांना नात्यांमधील घट्ट वीण, आपापसातील वाद-विवाद व त्यातून होणारी विनोदनिर्मिती मनोरंजनाची मेजवानी चाखायला मिळणार आहे. अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शन तर्फे निर्मित 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे करत आहेत. नात्यांमधल्या आंधळ्या कोशिंबीरीचा खेळ आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून अनेक प्रसिद्ध कलाकार पडद्यावर एकत्र येत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिकेचा आस्वाद या चित्रपटामधून रसिकांना घेता येणार आहे. त्यांच्यासोबत वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, प्रिया बापट, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, ऋषीकेश जोशी असे अनेक दिग्गज कलाकार काम करत आहेत. अनेकविध कलाकारांच्या विनोदी भूमिका असलेला 'आंधळी कोशिंबीर' हा चित्रपट पडद्यावर धमाल उडवून देणार आहे.
'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद आदित्य इंगळे आणि प्रताप देशमुख यांनी लिहिलेले आहेत तर अविनाश-विश्वजित या संगीतकार द्वयींनी आणि नरेंद्र भिडे यांनी या चित्रपटाला अतिशय सुरेल संगीत दिले आहे. वैभव जोशी यांनी या चित्रपटाची गीते लिहिलेली आहेत.सध्या या चित्रपटाच्या संकलनाचे काम जोरात सुरू असून लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे अशी माहिती चित्रपटाचे कार्यकारी निर्माते नितीन वैद्य यांनी मराठीमनोरंजनला दिली.
Sudha Productions
0 comments: